कोमेजल्या फुलांनी, ही प्रीत माळली आहे,
माझी अनंत स्वप्ने, मी आज जाळली आहे,
नव्हतो कधीच येथे, मी भाग शर्यतीचा,
समजावूनी मनाला, मी हार टाळली आहे
आता नसे कशाची, ओढ ही जीवाला,
सोडून पावलांना, ही वाट चालली आहे,
सरता सरता ही सरेना, हा काळोख दाटलेला
निजवून मज उशाशी, ही रात जागली आहे.
भिजवून आसवांनी, मोहरून सर्व काया,
ओल्या मिठीत माझ्या, ती आज गोठली आहे...!
-परशुराम महानोर